मुख्यपृष्ठआमच्याविषयी › दादांचा जीवन प्रवास

दादांचा जीवन प्रवास

Dada's Life Journey

कै. पू. नारायणराव रामराव काळदाते · संस्थापकांचा जीवन प्रवास
कै. पू. नारायणराव रामराव काळदाते
कै. पू. नारायणराव रामराव काळदाते
संस्थापक, श्री बनेश्वर शिक्षण संस्था

प्रस्तावना

स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाड्यातील अग्रणी शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या श्री.बनेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव स्व.नारायण दादा काळदाते यांचे नाव महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात आदराने घेतले जाते. बीड सारख्या मागास जिल्ह्यामध्ये शिक्षणाची वाणवा होती. नारायण दादांनी प्रतिकूल परिस्थितीत बीड जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्माण केले आणि तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहोचविले. त्यांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करून त्यांना 'शिक्षणमहर्षी' ही पदवी जनसामान्यांनी बहाल केली.

बालपण, शिक्षण, लग्न

नारायणदादा काळदाते यांचे घराणे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील ईस्थळ या गावचे. आई राधाबाई यांच्या पोटी 21 जुलै 1924 रोजी नारायणराव दादांचा जन्म झाला. वडील रामराव पाटील काळदाते शेती करता करता वडीलोपार्जित 'माली पाटीलकी' व निजामकालीन 'पटवारी' ही पदे सांभाळत. आई लहानपणीच वारल्याने रामराव पाटलांच्या पहिल्या पत्नी, सावत्र आई कोंडाबाई यांनी दादांना पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले व त्यांच्या बालमनावर अनमोल संस्कार केले. इयत्ता दहावीत असताना दादांचा विवाह माजलगाव तालुक्यातील जोड हिंगणी येथील सुभद्राभाईंशी पंढरपूर येथे झाला. निजाम राजवटीत ईस्थळ गावी शिक्षण व्यवस्था नसल्याने दादांना पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेत घातले गेले, जिथे चांगल्या शिक्षकांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

मॅट्रिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून इंजिनीयर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दादांना, वडील वृद्ध झाल्याने घराची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि ते 1942 मध्ये गावी परतले. 1942 ते 1958 या काळात त्यांनी वडीलोपार्जित शेती व पाटीलकी-पटवारकीची पदे सांभाळतानाच सामाजिक कार्यासही सुरुवात केली — प्लेगच्या साथीत निवाऱ्याचे व्यवस्थापन करून स्थलांतरित गरिबांना मदत केली, गरजू शेतकऱ्यांना बैल दिले, आजाऱ्यांना स्वतःच्या बैलगाडीने दवाखान्यात पोहोचवले. एक स्वच्छ चारित्र्याचा प्रामाणिक तलाठी अधिकारी म्हणून त्यांनी पंचक्रोशीत आपली प्रतिमा निर्माण केली. बार्शीचे मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेत, तीन मुले व चार मुली असा मोठा परिवार असूनही दादांनी सन 1958 ला समाजकार्यात पूर्णपणे झोकून देण्यासाठी संसाराचा त्याग केला — पत्नी सुभद्राबाईंनी मूकसंमतीने त्यांना साथ दिली.

"राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तद्नंतरे" — समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील हे वचन संस्थेचे ब्रीदवाक्य असून, श्रम, स्वावलंबन व समता या तीन तत्त्वांवर संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष आधारलेला आहे.

संस्थेची उभारणी

तत्कालीन बीड जिल्ह्यात साक्षरता प्रमाण अत्यल्प होते. 1958 ला बनसारोळा गावातील मुलांच्या शिक्षणासाठी पाचवी ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्याचा विचार ग्रामस्थ करत होते आणि त्यांनी तीर्थयात्रा रद्द करून तो पैसा शाळेसाठी लावण्याचा निर्णय घेतला. त्या गावात तलाठी असलेल्या दादांसह श्री.काशिनाथ रामराव गोरे, श्री.दगडुपंत नागोराव कुलकर्णी, डॉ.मदन व्यंकटराव काकडे, श्री.शंकरलाल किशनलाल तापडीया, श्री.शंकरराव नानासाहेब कदम, श्री.विष्णुपंत भाऊराव काकडे, श्री.गणपतराव केशवराव गोरे व इतर मंडळींनी मिळून 'श्री.बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा' या संस्थेची स्थापना केली आणि 'महाराष्ट्र विद्यालय' सुरू झाले. विद्यार्थीसंख्या वाढल्याने 1959 साली गावकऱ्यांच्या प्रयत्नाने 'विद्यार्थी वस्तीगृह' सुरू करण्यात आले, जिथे श्रम, स्वावलंबन, व्यवहारज्ञान व जीवनविकास या मूल्यांचा वस्तूपाठ दादांनी विद्यार्थ्यांना शिकवला.

शिक्षण कार्यात पूर्णपणे झोकून देण्यासाठी दादांनी आपल्या तलाठी पदाचा राजीनामा दिला आणि खेडोपाडी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलींची संख्या वाढावी म्हणून स्वतःची मुलगी कुसुम हिला बनसारोळ्याच्या विद्यालयात प्रवेश दिला, ज्यातून प्रेरणा घेत गावकऱ्यांनीही आपल्या मुलींना शाळेत घातले. सन 1961-62 ला हरिजन वाड्यातील बालकांसाठी बालवाडी सुरू करून, शासनाच्याही कित्येक वर्ष आधी दादांनी आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला. केज तालुक्यातील होळ येथे ग्रामस्थांकडून जमवलेल्या निधीतून सन 1963 साली 'श्री होळेश्वर विद्यालय' सुरू झाले, सोबतच सवर्णांसाठी होळेश्वर वस्तीगृह व मागासवर्गीय मुलांसाठी साने गुरुजी वस्तीगृह उभारले गेले.

सन 1982 मध्ये स्थापन झालेल्या मानवलोक संस्थेचे उपकेंद्र भावठाणा गावी सुरू झाल्यावर, डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या विनंतीनुसार दादांनी 1983 मध्ये तेथे 'साने गुरुजी विद्यालय' सुरू केले, जे टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंत विस्तारले. संस्थेची एखादी शाळा शहरी भागातही असावी या विचारातून सन 1984 साली अंबाजोगाई लगतच्या मोरेवाडी परिसरात 'गुरुदेव विद्यालय' व सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी 'गुरुदेव वस्तीगृह' सुरू झाले. दादांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक मंडळ, पुणे' चे सदस्य तसेच केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून घेण्यात आले. संस्थेचा कारभार पाहताना आर्थिक पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले — संस्थाचालक असूनही ते कार्यालयीन कामासाठी संस्थेची गाडी न वापरता एसटी बसने प्रवास करत.

1924
21 जुलै — ईस्थळ (जि. बीड) येथे नारायणराव काळदाते यांचा जन्म.
1942
कौटुंबिक जबाबदारीमुळे गावी परतले; शेती व पटवारी कामासोबत सामाजिक कार्यास प्रारंभ.
1958
श्री.बनेश्वर शिक्षण संस्था व महाराष्ट्र विद्यालय, बनसारोळा यांची स्थापना; संसाराचा त्याग.
1959
बनसारोळा येथे विद्यार्थी वस्तीगृह सुरू.
1961-62
हरिजन वाड्यात मागासवर्गीय बालकांसाठी बालवाडी सुरू.
1963
श्री होळेश्वर विद्यालय, होळ — होळेश्वर व साने गुरुजी वस्तीगृहांची स्थापना.
1982
मानवलोक सेवाभावी संस्थेचे अध्यक्षपद आजीवन स्वीकारले.
1983
साने गुरुजी विद्यालय, भावठाणा सुरू; पुढे दहावीपर्यंत विस्तार.
1984
गुरुदेव विद्यालय, मोरेवाडी व गुरुदेव वस्तीगृह सुरू.
1985
भारत सरकारकडून 'दलितमित्र' पुरस्काराने सन्मानित.
1991
बनसारोळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सुरू.
2000
अमृत महोत्सवी सत्कार; निधीतून 'श्री नारायणराव काळदाते मुलींचे वस्तीगृह' सुरू.
2008
7 सप्टेंबर — वयाच्या 84 व्या वर्षी हृदयरोगाने निधन.
2009
'पूज्य नारायण दादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान' ची स्थापना.

दादांचे व्यक्तिमत्त्व

'साधी राहणी उच्च विचारसरणी' या वृत्तीमुळे अनेक लोक चुंबकाप्रमाणे दादांकडे आकर्षित होत. शाहू-फुले-आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम.जोशी, लालबहादूर शास्त्री आणि शिक्षणमहर्षी मामासाहेब जगदाळे यांसारख्या थोर महापुरुषांचा तसेच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला होता. मध्यम पण दणकट शरीरयष्टी, डोक्यावर पांढरीशुभ्र गांधी टोपी, अंगात खादीचे स्वच्छ खमीस, पांढरे शुभ्र धोतर, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा व गळ्यात तुळशीची माळ असे त्यांचे साधे राहणीमान होते.

पहाटे वस्तीगृहातील मुलांचा अभ्यास घेणे, ज्ञानेश्वरी वाचन व विठ्ठल दर्शन, गावातील लोकांचे प्रश्न सोडवणे, दुपारी हिशोब व कामकाजाची देखरेख, संध्याकाळी मुलांसोबत खेळणे व जेवणे, रात्री अभ्यास करवून घेणे असा दादांचा शिस्तबद्ध दिनक्रम होता. स्वतःची कामे स्वतः करणे, वस्तीगृहासाठी किराणा सामान स्वतःच्या डोक्यावर आणणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे — स्वावलंबन व शरीरश्रमाला त्यांनी आयुष्यभर महत्त्व दिले. लहान बंधू डॉ.बापुसाहेब काळदाते जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते व खासदार असूनही, दादांनी त्यांच्या राजकीय शक्तीचा कधीही स्वार्थासाठी वापर केला नाही.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्य

तत्कालीन समाजात रूढ असलेल्या स्पृश्य-अस्पृश्य भेदाची दरी कमी करण्यासाठी दादांनी दलित वस्तीगृहासोबत सवर्णांसाठीही वस्तीगृह स्थापन केले आणि दोन्हींतील विद्यार्थ्यांची जेवणासाठी एकच पंगत बसवली. वस्तीगृहाच्या बांधकामावेळी विविध जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांना गावातील विठ्ठल मंदिरात एकत्र राहण्याची व्यवस्था केली, जे पुढे सर्व जाती-धर्मांसाठी खुले झाले. बाबा आढाव यांच्या 'एक गाव एक पाणवठा' मोहिमेअंतर्गत ईस्थळ परिसरातील सर्व पाणवठे गावकऱ्यांसाठी खुले केले, आणि आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार स्वतःच्या कुटुंबापासून सुरू केला — बंधू खासदार बापूसाहेब काळदाते यांचा ब्राह्मण कुटुंबातील सुधाताईंशी झालेला विवाह हे त्याचे उदाहरण. या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'दलितमित्र' पुरस्काराने सन्मानित केले.

वारकरी संप्रदाय व इतर सामाजिक कार्य

बालपणीचे शिक्षण पंढरपुरात झाल्याने दादांच्या व्यक्तिमत्त्वावर वारकरी संप्रदायाचा खोल प्रभाव होता. आषाढी वारी व हरिनाम सप्ताह कार्यक्रमांत त्यांचा आवर्जून सहभाग असे, आणि समाजात एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर व ह.भ.प. माधव शास्त्री महाराज यांनी त्यांना मुकुंदराज स्वामी मंदिर ट्रस्टचे सचिव म्हणून घेतले. सन 1982 पासून त्यांनी मानवलोक सेवाभावी संस्थेचे अध्यक्षपद आजीवन सांभाळले — या संस्थेने बालवाड्या, अभ्यासिका, कुरण शाळा, क्रीडांगणे, मुलींसाठी वस्तीगृह, समाज विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालय अशा उपक्रमांतून शैक्षणिक-सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहोचवले. सन 1991 मध्ये बनसारोळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सुरू केले आणि 1962 मध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी बीड जिल्ह्यातील पुरुष नसबंदी कार्यक्रमात पुढाकार घेतला.

पुरस्कार

दादांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले — डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार (1985), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा भूषण पुरस्कार (2001), महात्मा गांधी सन्मानपत्र (2001), रोटरी भूषण पुरस्कार (2004), राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार (2005), गोविंद भाई श्रॉफ स्मृती पुरस्कार (2005), आणि सोशल इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन पुरस्कार (2006). जानेवारी 2000 मध्ये त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला, आणि जमलेल्या निधीतून मानवलोक संस्थेच्या जागेत 'श्री नारायणराव काळदाते मुलींचे वस्तीगृह' सुरू करण्यात आले.

निधन व स्मृती प्रतिष्ठान

7 सप्टेंबर 2008 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी हृदयरोगाने नारायणराव काळदाते यांची प्राणज्योत मालवली, आणि अवघा बीड जिल्हा हळहळला. त्यांच्या निधनानंतर डॉ.द्वारकादासजी लोहिया, श्री.जी.जी.रांदड, श्री.एस.के.जोगदंड, श्री.बी.बी.ठोंबरे, स्व.अंकुशराव काळदाते, श्री.मदनराव नरवडे, अमर हमीब व डॉ.नरेंद्र काळे यांनी मिळून सन 2009 मध्ये 'पूज्य नारायण दादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान' (अंबाजोगाई, जि. बीड) ची स्थापना केली. या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी स्मृतिदिनी शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला 'नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार' दिला जातो, तसेच होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते.

राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तद्नंतरे
← Back to About the Sanstha